राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदर्श शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदर्श शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान


भारताला वैश्विक ज्ञान महासत्ता बनविण्‍याबरोबरच, जगातील सर्वोत्तम शिक्षक अशी आपल्या शिक्षकांची ओळख बनावी : राष्ट्रपती मुर्मू

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 सप्टेंबर 2025) शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात देशभरातील आदर्श शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

मेळाव्याला मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. समजूतदार शिक्षक मुलांमध्ये सन्मान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम करतात. आपण शिक्षक म्हणून कार्य करताना,  आलेल्या अनुभवांचे स्मरण करताना राष्‍ट्रपती मुर्मू म्हणाल्या  तो माझ्या आयुष्यातील एक अतिशय अर्थपूर्ण काळ होता.

राष्ट्रपती म्हणाल्या की, शिक्षण एखाद्या व्यक्तीला सक्षम बनवते. गरीब कुटुंबातील मुलांची शिक्षणाच्या बळावर गगनाला भिडू शकेल, इतकी प्रगती करू शकतात. मुलांना अशी उंच भरारी  घेता यावी,  यासाठी  बळ देण्यामध्‍ये  प्रेमळ आणि समर्पित शिक्षकांची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे त्यांचे विद्यार्थी त्यांना आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि ही मुले पुढे  कुटुंबासह, समाज आणि देशासाठी प्रशंसनीय योगदान देतात.

राष्ट्रपती म्हणाले की, विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणे हे शिक्षकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. नैतिक आचरणाचे पालन करणारे संवेदनशील, जबाबदार आणि समर्पित विद्यार्थी केवळ स्पर्धा, पुस्तकी ज्ञान आणि स्वार्थात रस असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगले असतात. एका चांगल्या शिक्षकाकडे  भावना आणि बुद्धिमत्ता दोन्ही असतात. भावना आणि बुद्धिमत्तेचा समन्वय साधला की, त्याचा विद्यार्थ्यांवरही परिणाम होतो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, स्मार्ट ब्लॅकबोर्ड, स्मार्ट वर्गखोल्या आणि इतर आधुनिक सुविधा, यांचे  स्वतःचे असे महत्त्व आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट शिक्षक. स्मार्ट शिक्षक म्हणजे, असे शिक्षक जे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विकासाच्या गरजा समजून घेतात. स्मार्ट शिक्षक प्रेम आणि संवेदनशीलतेने अभ्यासाची प्रक्रिया मनोरंजक आणि प्रभावी बनवतात. असे शिक्षक विद्यार्थ्यांना समाज आणि राष्ट्राच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम बनवतात.

राष्ट्रपतींनी सांगितले की, “मुलींच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करून आपण आपल्या कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या घडणीत एक अमूल्य गुंतवणूक करतो.” तसेच त्यांनी नमूद केले की, मुलींना उत्तम शिक्षण देणे ही महिला नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे. त्याचबरोवर त्यांनी अधोरेखित केले की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये वाढविण्यावर तसेच वंचित वर्गांतील मुलींसाठी विशेष शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र शिक्षणासंबंधित कोणत्याही उपक्रमाचे यश प्रामुख्याने शिक्षकांवर अवलंबून असते. त्यांनी शिक्षकांना सांगितले की, जितके अधिक आपण मुलींना शिक्षण देण्यात योगदान देऊ, तितके आपले शिक्षक म्हणून जीवन अधिक अर्थपूर्ण ठरेल. तसेच त्यांनी शिक्षकांना आवाहन केले की, स्वभावाने लाजाळू किंवा सामाजिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष द्यावे.

   

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवण्याचा आहे. यासाठी आपल्या शिक्षकांना जागतिक स्तरावर सर्वोत्तम शिक्षक म्हणून ओळखले गेले पाहिजे. तसेच आपल्या संस्था आणि शिक्षकांनी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये सक्रीय योगदान दिले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या शिक्षकांच्या मोलाच्या योगदानामुळे भारत जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून उभा राहील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

   

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा